तिरुपती बालाजी देवस्थानाबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी!

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले तिरुमाला तिरुपती येथील वेंकटेश्वर स्वामी मंदिर हे सर्व वैष्णवांचे देवस्थान अतिशय प्रसिद्ध आहे. ह्या देवळात भगवान विष्णू हे श्री वेंकटेश्वरांच्या रुपात निवास करतात अशी भक्तांची धारणा आहे. श्री वेंकटेश्वरांनी समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी व कलीयुगातील संकटांपासून माणसांना वाचवण्यासाठी येथे अवतार घेतला अशी मान्यता आहे. म्हणूनच ह्या जागेला कलियुगातील वैकुंठ म्हणतात, तर भगवान श्री वेंकटेश्वरांना कलियुगातील प्रत्यक्ष देवता असे संबोधले जाते.

ह्याच देवळाला तिरुमला मंदिर किंवा तिरुपती मंदिर किंवा तिरुपती बालाजी मंदिर असेही म्हटले जाते आणि श्री वेंकटेश्वरांना भक्त बालाजी, गोविंदा आणि श्रीनिवास अशीही संबोधने देतात.

हे देऊळ श्री स्वामी पुष्करणी ह्या पवित्र जलकुंडाच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर वसलेले आहे. हे देऊळ इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात द्राविडी पद्धतीने बांधलेले आहे आणि ह्या देवळातील गर्भगृहाला आनंदनिलायम असे म्हणतात. हे तीर्थक्षेत्र स्वयंभू विष्णू क्षेत्रांपैकी एक आणि १०६ वे म्हणजेच पृथ्वीवरील शेवटचे ‘दिव्य देसम’ मानले जाते.

तिरुमला पर्वतरांगा ह्या शेषाचलम पर्वतरांगांचा एक भाग आहे. ह्या पर्वतरांगा समुद्रसपाटीपासून ८५३ मीटर उंचावर आहेत. ह्या पर्वतरांगेची सात शिखरे ही आदिशेषाची सात शीरे आहेत असे लोक म्हणतात. शेषाद्री, नीलाद्री, गरुडाद्री, अंजनाद्री, वृषभाद्री, नारायणाद्री व वेंकटाद्री अशी ह्या सात शिखरांची नावे आहेत. हे देऊळ वेंकटाद्री ह्या शिखरावर आहे. म्हणूनच ह्या देवळाला ‘सात शिखरांचे मंदिर (Temple of Seven Hills) असे म्हटले जाते.

हे देवस्थान जगातील सर्वात श्रीमंत देवस्थान मानले जाते. रोज जवळजवळ ५०,०० लोक येथे दर्शनासाठी येतात आणि भरपूर देणगी देतात. ज्यांची इच्छा असेल किंवा नवस असेल असे स्त्री पुरुष येथे आपल्या केसांचे देखील दान करतात. ह्या ठिकाणी दर वर्षी जो ब्रह्मोस्तव साजरा केला जातो, त्यावेळी देवाच्या दर्शनाचा लाभ घ्यायला जवळजवळ ५,००,००० लोक येतात.

अश्या तिरुपती बालाजी मंदिराविषयी आज आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

१. वेंकटेश्वर स्वामींच्या मूर्तीवर जे केस आहेत ते खरे केस आहेत. असे म्हणतात की हे केस कधीही गुंतत नाहीत आणि नेहेमी मउ मुलायम राहतात.

२. वेंकटेश्वर स्वामी म्हणजेच श्री बालाजी ह्यांच्या मूर्तीचा जो पाठीमागचा भाग आहे तो नेहेमी पाण्याने ओला असतो. ह्या मूर्तीकडे लक्ष देऊन कान लावून ऐकल्यास मूर्तीमधून समुद्राच्या लाटांचा आवाज येतो.

३. मंदिराच्या दाराजवळील उजव्या बाजूला एक छडी ठेवलेली असते. असे म्हणतात की ह्या छडीचा उपयोग देवांच्या बाल रुपाला मारण्यासाठी केला गेला होता. तेव्हा त्यांच्या हनुवटीवर जखम झाली होती. ह्या कारणाने त्यांच्या हनुवटीवर चंदनाचा लेप लावण्याची सुरवात झाली.

४. साधारणपणे आपण गर्भगृहात बघतो तेव्हा आपल्याला वाटते की गर्भगृहाच्या केंद्रस्थानी मूर्ती आहे. पण खरे तर बाहेरून बघितल्यास देवांची मूर्ती ही उजव्या बाजूला स्थानापन्न आहे असे दिसते.

५. देवांच्या मूर्तीला वाहिलेली सर्व फुले व तुळशीची पाने प्रसाद म्हणून भक्तांना न देता मागील बाजूस असलेल्या विहिरीत ती टाकून दिली जातात. इतर ठिकाणी मात्र देवाला वाहिलेले हार व फुले दर्शनाला येणाऱ्यांना प्रसाद म्हणून दिले जातात.

६. दर गुरुवारी देवांच्या मूर्तीवर पांढऱ्या चंदनाचा लेप लावला जातो. जेव्हा हा लेप काढतात तेव्हा मूर्तीवर लक्ष्मी देवीची चिन्हे उमटलेली दिसून येतात.

७. मंदिरातले पुजारी जेव्हा जेव्हा पूजा करतात तेव्हा देवाला वाहिलेली सर्व फुले मागील बाजूस असलेल्या विहिरीत वेळोवेळी टाकून देत असतात पण एकदाही त्या टाकून दिलेल्या फुलांकडे बघत नाहीत. ती फुले बघणे चांगले नसते असे म्हणतात.

८. १८व्या शतकात हे मंदिर तब्बल १२ वर्ष बंद ठेवले होते. कारण एका राजाने १२ लोकांना मृत्युदंड देऊन मंदिराच्या भिंतींवर फाशी दिले होते. असे म्हणतात की हे बघून तेव्हा स्वयं वेंकटेश्वर स्वामी तिथे प्रकट झाले होते.

९. ह्या मंदिरात एक नंदादीप आहे जो सतत तेवत असतो. हा दिवा गेली अनेक वर्ष अखंड तेवतो आहे. कोणालाही नेमके आठवत नाही की नेमका केव्हापासून हा दिवा मंदिरात प्रज्वलित करण्यात आला आहे.

१०. देवाच्या मूर्तीला पंचाई कर्पुरम लावले जाते. हे कापरापासून बनवले जाते . असे म्हणतात की हा लेप जर साध्या दगडाला लावला तर तो दगड भंगतो पण ह्या पंचाई कर्पूरम चा देवाच्या मूर्तीवर कुठलाही परिणाम होत नाही.

 

तर असे हे भारतातील सर्वात वैभवशाली असलेले देवस्थान अतिशय निसर्गरम्य स्थानी वसलेले आहे. तिकडे गेल्यानंतर भक्तांचा ‘गोविंदा हरी गोविंदा, वेंकटरमणा गोविंदा’ हा जप ऐकून, देवाची भव्य दिव्य आणि सुंदर मूर्ती बघून प्रत्येकाला प्रसन्न वाटते. देवाचे शांत रूप पाहून आपलेही मन शांत होते.

साभार inmarathi . com

One Comment on “तिरुपती बालाजी देवस्थानाबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी!”

  1. he mandir mhnje suvarna mandir mulat chakravarti samrat ashoka ne bandhle aahe. aani dusra mhnje boudha bhikshu madhil sarvat shrestha mahathero yanche he mandir aahe, aani boudhha samaja madhech kes kaple jatat. tya mule ajunahi tithe kesa kapnyachi pratha aahe, parantu hi histry lapvun thevli aahe, kahi samaj kantakani..
    maha thero theropati yachach apbransha tirupati kela aahe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *